मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये २८ तृतीयपंथीयांनी सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या त्यांची प्रकृती बिघडली असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे संपूर्ण प्रकरण एका तृतीयपंथीयावर झालेल्या कथित बलात्कार आणि खंडणी प्रकरणाशी संबंधित आहे.

ही घटना इंदुरच्या पंढरीनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नंदलालपुरा भागात घडली. याठिकाणी राहणाऱ्या २८ तृतीयपंथियांनी एका खोलीमध्ये दरवाजा बंद करून फिनाइल प्यायले. याचा व्हिडीओ तयार करून त्यांनी सोशल मीडियावर टाकला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला आणि सर्व तृतीपंथी यांना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
नंदलालपुरा येथे दोन तृतीयपंथीयांच्या गटांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. येथे एक गट सपना गुरुचा आहे तर दुसरा गट सीमा आणि पायल गुरुचा आहे. दोघांमध्ये अनेकदा वाद होतात. मंगळवारी किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी देखील इंदूरला आले आणि त्यांनी या वादाबाबत अधिकाऱ्यांची भेट घेतली. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या तृतीयपंथीयांमधील या वादाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
परंतु तपास पूर्ण होऊ शकला नाही. बुधवारी रात्री तृतीयपंथीचा एका गटाने रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एका खोलीत जाऊन दरवाजा बंद करून एकत्रित फिनाइल प्यायले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.