टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या एका महिलेने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिने इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी घेत आपला जीव दिला. त्यापूर्वी तिने आपल्या वडिलांना मेसेज केला होता.
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका ३७ वर्षीय महिलेने बहुमजली इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवली. मृत महिलेचं नाव सुरभी जैन असून ती नैराश्यात असल्याची माहिती आहे. ती एका खासगी कंपनीत मॅनेजरच्या पदावर कार्यरत होती. ती टीसीएस कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होती. पतीशी वाद झाल्याने ती एकटीच राहत होती.
घटनास्थळावरुन पोलिसांनी सुरभीचा फोन जप्त केला. तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वडिलांना 'I Am Sorry Papa' असा मेसेज पाठवला होता. पोलिस बीसीएम हाइट्समध्ये लागलेल्या सीसीटीव्हीचा तपास करत आहेत. तसेच, सुरभीचं कुटुंब आणि तिच्या मित्रांचीही चौकशी केली जात आहे. जेणेकरुन तिच्या आत्महत्येमागील खरं कारण समोर यावं.
दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती पोलिसांना सोमवारी दुपारी मिळाली. बीसीएम हाइट्सच्या ८ व्या मजल्यावरुन उडी घेत महिलेने जीव दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणाचा गांभीर्याने तपास केला जात आहे. त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल. सुरभीच्या या निर्णयाने तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यावर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे.