नवीन नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल करुन त्या मागे घेण्याच्या मोबदल्यात 25 लाख रुपयांची खंडणी मागून त्यापोटी 2 लाख रुपयांची खंडणी स्वीकारणाऱ्या दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी हनुमान प्रभाकर दराडे (रा. नागरेनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) हे मोडाळे गावचे ग्रामपंचायत अधिकारी आहेत. आरोपी केशव गुलाब बोडके व दिनकर गुलाब बोडके (दोघे रा. वाडीवऱ्हे, ता. इगतपुरी) यांनी संगनमत करुन मोडाळे गावात केलेल्या विकासकामांच्या चौकशी संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी दराडे यांच्याविरोधात खोट्या तक्रारी केल्या. या तक्रारी मागे घेण्याकरीता बोडके बंधुंनी दरोडे यांना पाथर्डी फाटा येथे हॉटेल सेवन हेवन येथे भेटून दराडे यांना दमदाटी व जिवे मारण्याची धमकी देऊन 25 लाख रुपयांची खंडणी मागितली.
तसेच 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाथर्डी फाटा येथे बोडके बंधुंनी फिर्यादींची इच्छा नसताना त्यांच्याकडून 2 लाख रुपये खंडणी स्वरुपात घेतले. तसेच आरोपींनी फिर्यादी यांना प्रत्यक्ष भेटून व त्यांच्या हस्तकांकरवी जिवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादी दराडे यांच्याविरोधात उपोषणाला बसतो, तुम्हाला कामाला लावतो, कायमचे घरी पाठवून बडतर्फ करतो, अशा धमक्या देऊन ग्रामपंचायत अधिकारी दराडे यांना मानसिक त्रास दिला जात असून, वेळोवेळी 25 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी बोडके बंधू करत असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनार करीत आहेत.
दोघा भावांनी उकळले 2 लाख रुपये; गुन्हा दाखल