नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सेवानिवृत्त कर्नलची ७२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक नरेश कारडाला गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की कारडा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे डायरेक्टर नरेश कारडा (वय ५२) यांनी देवळाली कॅम्प येथील हरिनिकेतन फेज-२ या निवासी बिल्डिंगमध्ये राहणारे फ्लॅटधारक व दुकानधारकांना अंधारात ठेवून बनावट गहाणखत बनवून कारडा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला २३ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून दिले.
हा प्रकार नरेश कारडाने कॅप्री ग्लोबल कंपनीचे डायरेक्टर यांच्यासोबत संगनमताने केला. कारडाने कॅप्री ग्लोबलच्या डायरेक्टर यांच्यासोबत मिळून कर्ज देण्याच्या आधी फ्लॅटधारकांना अंधारात ठेवून हरिनिकेतन फेज-२ गहाण ठेवून २३ कोटी रुपयांचा लाभ घेतला. नरेश कारडाने फिर्यादी निवृत्त कर्नल विक्रम दिलीपकुमार आदित्य (वय ५९) यांच्याकडून चेकद्वारे ७२ लाख १ हजार ९२० रुपये स्वीकारले होते.
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नरेश कारडा व कॅप्री ग्लोबल कंपनीचे सर्व डायरेक्टर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा सर्व प्रकार दि. १५ एप्रिल २०१९ ते दि. २ डिसेंबर २०२५ दरम्यान घडला. पोलिसांनी नरेश कारडाला काल रात्री अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत करीत आहेत.
नरेश कारडाविरुद्ध यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याने त्यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.