नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- माहेरून पैसे आणण्यासाठी व दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवण्यासाठी पतीसह सासरच्या लोकांनी महिलेचा छळ केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की पीडितेचे बुलढाणा जिल्ह्यातील एका इसमासमवेत सन 2020 मध्ये लग्न झालेले होते. सुरुवातीला दोन महिने चांगले गेल्यानंतर सासरच्या लोकांनी आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली. घर घेण्यासाठी विवाहितेने माहेरून पैसे आणावेत यासाठी तिचा पती, सासू, सासरा व दीर हे तिचा छळ करू लागले. विवाहितेच्या पतीचे एका महिलेेसोबत अनैतिक संबंध होते.
विवाहानंतर या अनैतिक संबंधांमध्ये तिने अडथळा आणू नये म्हणून पतीने तिला वेळोवेळी मारहाण करून तिचा शारीरिक छळ केला. एक दिवस सासरच्यांनी विवाहितेला घराबाहेर हाकलून दिले. हा सर्व प्रकार डिसेंबर 2020 ते 20 मे 2025 या कालावधीत घडला. सासरच्यांच्या त्रासाला कंटाळल्याने विवाहितेने अखेर त्यांच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.