तपोवनातील स्वामीनारायण हॉलमधून साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना साडेबारा लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोकड असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे सपोनि जगदाळे आणि सहकार्यांनी आरोपींचा शोध घेत मध्य प्रदेशातील बोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या आरोपीच्या नातेवाईकाकडून बारा लाख 50 हजार रुपये किंमतीचे 125 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
याबाबत माहिती अशी, की दिघोरी (ता. जि. नागपूर) येथील रहिवासी सुषमा शेषराज निर्वाण (वय 52) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती, की तपोवनातील स्वामीनारायण हॉलमध्ये मुलाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना टिळा लावण्याच्या निमित्ताने त्या पर्स एका खुर्चीवर ठेवून गेल्या. परत आल्यानंतर पर्स बेपत्ता झाल्याचे दिसून आले.
पर्समध्ये 45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र, 40 ग्रॅम वजनाचा सोन्याचा चपलाहार, 30 ग्रॅम वजनाचे दोन डोरले आणि 25 हजार रुपये रोख, त्याचबरोबर 15 ग्रॅम वजनाचे कानातील झुमके व रियल मी कंपनीचा मोबाईल असा ऐवज होता. हा ऐवज चोरीस गेल्याबाबत त्यांनी सहा नोव्हेंबर रोजी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपायुुक्त मोनिका राऊत, पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना सूचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे यांनी हॉलचे सीसीटिव्ही फुटेज तपासले. दरम्यान, हवालदार दादासाहेब वाघ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत संबंधित आरोपी हे मध्य प्रदेशातील असल्याचे समजले.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, हवालदार वाघ, शेख, कॉन्स्टेबल भुजबळ व लिलके यांच्या पथकाने मध्य प्रदेशात जाऊन बोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या संशयित आरोपीचा तपास केला; मात्र आरोपी सापडला नाही. दरम्यान, आरोपीच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन या गुन्ह्यातील बारा लाख 50 हजार रुपये किंमतीचे दागिने नातेवाईकांकडून जप्त केले.