नाशिक :- 7000 रुपयांची लाच घेताना नाशिक महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. राजेंद्र पांडुरंग भोरकडे (वय 52, रा. राजकमल बंगला, वृंदावन नगरी, हिरावाडी, पंचवटी, नाशिक) असे लाच घेणाऱ्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की तक्रारदार यांचा भाऊ दिव्यांग असून त्यांची स्नॅक्सची हातगाडी अतिक्रमण विभागाने उचलून नेली होती म्हणून तक्रारदार हे नाशिक महानगरपालिकेतील अतिक्रमण विभाग येथे जाऊन उपयुक्त यांना भेटून भाऊ दिव्यांग असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांची स्नॅक्सची हातगाडी सोडून द्या आणि भावाची स्नॅक्सची हातगाडी अमृतधाम होकर झोन मध्ये बसून द्या अशी विनंती तक्रारदाराने केली होती.
उपायुक्तांनी तक्रारदाराच्या भावाची गाडी सोडून देऊन त्यांची हातगाडी अमृतधाम होकर झोन मध्ये बसवून देण्याबाबत आरोपी भोरकडे यांना सांगितले होते. तरी भोरकडे यांनी स्नॅक्सची हात गाडी सोडून देण्यास टाळाटाळ करून तक्रारदार यांना दंडाची रक्कम 18 हजार रुपये न भरता त्या मोबदल्यात नऊ डिसेंबर रोजी प्रथम 9,000 ची मागणी करून तडजोडी अंति सात हजार रुपये लाचेची रक्कम मागितली. तक्रारदाराने याबाबत लाच लूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 11 डिसेंबर रोजी सापळा रचला.
आज महानगरपालिकेच्या राजीव गांधी भवन येथील मुख्यालयात फेरीवाला कॅबिनच्या बाहेरील पुरुषांच्या प्रसाधनगृहात सात हजार रुपयांची लाच घेताना भोरकडे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.