नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- आर्थिक व्यवहारातून झालेल्या फसवणुकीच्या कारणातून इसमास आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ओम्कार ऊर्फ सचिन कारभारी सानप (रा. हनुमानवाडी, पंचवटी) यांचा भाऊ सुदर्शन कारभारी सांगळे (वय 51, रा. रेणुका हाईट्स, मखमलाबाद रोड, पंचवटी) याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याने त्याच्या मृत्यूपूर्वी लिहिलेली त्याच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी त्यांचा भाचा निखिल शंकर आव्हाड याला पँटच्या खिशात मिळून आली. फिर्यादीचे भाऊ मयत सुदर्शन सांगळे यांनी चिठ्ठीत नमूद केल्याप्रमाणे आरोपी नवनाथ परशराम टिळे (रा. टीपी स्टेशन, एकलहरा कॉलनी, नाशिकरोड) व राम किसनराव शिंदे (रा. हिवरखेडे, ता. चांदवड, ह. मु. नाशिक) यांच्यासोबत आर्थिक व्यवहार केलेला होता.
या आर्थिक व्यवहारात फसवणूक केल्याने फिर्यादीचा भाऊ सुदर्शन सांगळे याला आरोपींनी आत्महत्येस प्रवृत्त केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नवनाथ टिळे व राम शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.