नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- जिल्हा प्रशासन आणि वायुसेनेच्या वतीने उद्या (दि.22) व शुक्रवारी (दि.23) गंगापूर धरण बॅक वॉटर परिसरात ‘सूर्यकिरण एअर शो’चे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी आनंदवल्ली येथून पुढे थेट हरसूलपर्यंत वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. दोन्ही दिवस सकाळी आठ वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहनांना गंगापूर रोडवर प्रवेश बंद राहणार असल्याचे शहर वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंगापूर धरण परिसरात ‘एअर शो’ होणार आहे. हा शो बघण्यासाठी नाशिककरांसह इतर जिल्ह्यातूनसुद्धा नागरिकांची वर्दळ गंगापूर रोडवर राहणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात घडू नये, यासाठी गंगापूर रोडने आनंदवल्ली गावापासून पुढे बारदान फाटा, गंगापूर गाव, गिरणारे गावाकडे जाणार्या सर्व प्रकारच्या एसटी बसेस, सिटिलिंक बसेस, खासगी बसेस, जड-अवजड मालवाहू वाहने, भाजीपाला वाहतूक करणारी वाहने, खासगी प्रवासी वाहतूक करणार्या काळी-पिवळी टॅक्सी अशा वाहनांना दोन्ही दिवस प्रवेश बंद राहणार आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलीस सेवेतील वाहने, शववाहिका यांना निर्बंध लागू राहणार नाही, असे वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
पर्यायी मार्ग असा
1) आनंदवल्ली गावामधून उजवीकडे वळण घेत चांदशी पुलावरून मुंगसरा फाटामार्गे पुढे दुगाव मार्गे वाहने ये-जा करतील.
2) गंगापूर रोडने भोसला शाळेसमोरील गेटसमोरून सावरकरनगर मार्गे बापू पुलावरून पुढे पुढे वाहतूक मार्गस्थ होईल.