“या
“या" दोन बंधूंसाठी मनपाच्या निवडणुकीत '९' अंक ठरला भाग्यवान:-अंकशास्त्राचा प्रत्यय
img
Chandrakant Barve

नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- मानवी जीवनात अंकशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे मानले जाते आणि त्याचा प्रत्यय अनेकदा घडामोडींमधून येत असतो.

नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ व १७ मधील दिवे बंधूंच्या निकालातून हाच अनुभव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या दोन्ही प्रभागांतील निकालांकडे पाहता ‘९’ हा अंक या निवडणुकीत दिवे बंधूंसाठी विशेष लाभदायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

यंदाच्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेनेच्या वतीने राहुल अशोक दिवे यांनी तर प्रभाग क्रमांक १७ मधून भाजपाकडून प्रशांत अशोक दिवे यांनी उमेदवारी केली होती. हे दोघेही नाशिक नगरीचे माजी महापौर अशोक दिवे यांचे सुपुत्र आहेत. विशेष म्हणजे वेगवेगळ्या राजकीय पक्षांतून निवडणूक लढवत असतानाही या दोन्ही भावांनी आपल्या-आपल्या पॅनलचे नेतृत्व समर्थपणे सांभाळले.

राहुल दिवे यांनी प्रभाग १६ मध्ये आपल्या पॅनलसह प्रभावी प्रचार करत मतदारांचा भरघोस पाठिंबा मिळवला. त्यांच्या पॅनलमधील उमेदवारांना विजयापर्यंत नेण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्याचा सकारात्मक परिणाम निकालात दिसून आला. तर दुसरीकडे, प्रभाग १७ मध्ये प्रशांत दिवे यांनीही जोरदार लढत दिली. त्यांच्या पॅनलमधून मतदारांनी केवळ त्यांनाच प्रतिनिधित्वाची संधी दिली असली, तरी त्यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवत आपली लोकप्रियता सिद्ध केली.

या दोन्ही निकालांकडे अंकशास्त्रीय दृष्टीने पाहिले असता एक रंजक बाब समोर येते. प्रशांत दिवे यांना ९९९९ मते मिळाली, तर राहुल दिवे यांना तब्बल ९३०० मतदारांनी प्रतिनिधित्वाची संधी दिली. दोन्ही ठिकाणी ‘९’ या अंकाची ठळक उपस्थिती दिसून येते. त्यामुळे या निवडणुकीत दिवे बंधूंना ‘९’ या भाग्यांकाने प्रगतीपथावर नेले, अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

विजयाच्या आनंदासोबतच अंकशास्त्राचा हा योगायोग चर्चेचा
विषय ठरत असून, प्रभाग १६ व १७ मधील निकालांमुळे “दिवे बंधूंसाठी नऊ अंक ठरला भाग्यवान” असेच चित्र सध्या नाशिक शहरात पाहायला मिळत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group