आज राज्यातील मुंबई महापालिकेसह २९ महापालिका निवडणुकांसाठी मतमोजणी झाली. बहुसंख्य महापलिकांमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नाशिकमध्ये देखील भाजपने मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजपकडून जल्लोष केला जात आहे. नाशिकमधील ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी काल ५६.७६ टक्के मतदान झाले होते. दरम्यान आज निकाल समोर आला असून नाशिकमध्ये बड्या नेत्यांना धक्का बसला आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ मधील लढत ही नाशिकमधील सर्वात चर्चेत राहिलेली लढत होती. प्रभाग क्रमांक 29-अ मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. या लढतीत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांचा दारुण पराभव झाला आहे.पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या दीपक बडगुजर यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
प्रभाग क्रमांक ५ मध्ये मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचा माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी पराभव केला आहे. अशोक मुर्तडक प्रभाग क्रमांक ५ मध्ये गेल्या अनके वर्षपासून निवडून येत होते. यावेळेस देखील मुर्तडक निवडून येतील असा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जात होता. मात्र प्रभागात गुरुमित बग्गा यांनी विजय मिळवत अशोक मुर्तडक यांना मोठा धक्का दिला आहे.
त्यासोबतच प्रभाग ७ 'ड' मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते आणि भाजपच्या आमदार सीमा हिरे यांचे दीर माजी नगसेवक योगेश(मुन्ना) हिरे यांच्यातील सामन्याकडे शहराचे लक्ष लागले होते. आज निवडणुकीचा निकाल लागला. शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांनी आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हीरे यांचा दारुण पराभव केला आहे. आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे यांचा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते अजय बोरस्ते यांनी पराभव केल्याने हा सीमा हिरे यांच्यासाठी देखील मोठा धक्का मानला जात आहे.
प्रभाग क्रमांक १३ मधील लढत देखील चांगलीच चर्चेत होती. माजी महापौर यतीन वाघ यांच्या पत्नी हितेश वाघ यांचा प्रभाग क्रमांक १३ मधून पराभव झाला आहे. त्यांचा मनसेच्या मयुरी पवार यांनी पराभव केला आहे.
त्यासोबतच शहरातील आणखी एक निवडणुकीकडे शहराचे लागले होते. ती लढत होती प्रभाग क्रमांक ६ ड मध्ये. भाजपच्या माजी उपमहापौर भिकूबाई बागुल यांचा नातू आणि ज्येष्ठ नेते सुनील बागुल यांचे पुत्र मनीष बागुल यांच्या लढतीकडे सर्वाचेच लक्ष होते. मात्र याठिकाणी मनीष बागुल यांचा पराभव झाला आहे. शिंदे सेनेच्या प्रमोद पालवेंचा याठिकाणी विजय झाला आहे.
प्रभाग क्रमांक - २४ क मध्ये कल्पना चुंभळे यांचा प्रभाव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पूनम महाले यांचा विजय झाला आहे. तर प्रभाग क्रमांक - २४ ब मध्ये कैलास चुंभळे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. याठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रवीण तिदमे यांचा विजय झाला आहे.
प्रभाग क्रमांक ३१ - माजी नगरसेविका संगीता जाधव यांना प्रभाव स्वीकारावा लागला आहे तर याठिकाणी शिवसेना ( उबाठा ) गटाच्या वैशाली दळवी यांचा विजय झाला.
प्रभाग क्रमांक १ मध्ये माजी नगरसेवक अरुण पवार यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याची येथे सत्ता होती. याठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे प्रवीण जाधव यांचा विजय झाला आहे.