सातपूर- अशोकनगर परिसरातील स्टेट बँकेजवळ भरधाव वाहनाच्या धडकेने दोन नागरिक किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. २४) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला असून संतप्त नागरिकांनी संबंधित वाहनाची तोडफोड केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहिती, महिंद्रा कंपनीची एसयूव्ही (क्रमांक एम.एच. १५ के.के. ३१५४) ही गाडी अशोकनगर रस्त्याने वेगाने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या दोन वाहनांना या गाडीने धडक दिली. या अपघातात दोन नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाच्या वेगामुळे संतप्त झालेल्या जमावाने एसयूव्ही वाहनाची तोडफोड केली. यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, अशोकनगर परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून भरधाव वाहने चालवली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार केल्या जात आहेत.
संबंधित कार सातपूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याची असल्याचे समजते. सदर पोलीस कर्मचारी आपली ड्युटी संपून घरी जात असताना हा अपघात घडला. पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचे नागरिकांनी सांगितले.