
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सातपूर येथील गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढे, दीपक लोंढे व भूषण लोंढे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. सातपूर परिसरातील जमीन बळकावून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात लोंढे पितापुत्रांविरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी शाहू बाबूराव म्हस्के (वय 76, रा. विठ्ठलनगर, कामटवाडे) यांची सातपूर शिवारातील सर्व्हे नंबर 183/1 मध्ये 23 गुंठे शेतजमीन आहे. या जमिनीवर आरोपी शोभा ऊर्फ सखूबाई म्हस्के, राहुल म्हस्के, शोभा म्हस्के यांची मुलगी, बिबाबाई यशवंत खंडेराव ऊर्फ चव्हाण व यशवंत खंडेराव ऊर्फ चव्हाण (सर्व रा. सातपूर) यांनी अतिक्रमण करून जमिनीवर कब्जा केला होता. ही जमीन बेकायदेशीरपणे हडपण्याचा कट आरोपी प्रकाश लोंढे, भूषण लोंढे व दीपक लोंढे यांनी रचल्याचे शाहू म्हस्के यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
शाहू म्हस्के यांनी ही जमीन विकण्याचा प्रयत्न केला असता प्रकाश लोंढे यांनी ते सांगतील, त्याच भावात व त्यांनाच विकण्याचे शाहू म्हस्के यांना सांगितले. ही जमीन मी कोणालाही खरेदी करू देणार नाही, अशी धमकी लोंढे यांनी शाहू म्हस्के यांना दिली.
शाहू म्हस्के यांची जमीन बळकावून त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे करीत आहेत.