सातपूर- परिसरातील एका शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये वर्गातच झालेल्या हाणामारीत एका विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३१) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार दोन विद्यार्थ्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद त्या वेळी मिटला असला, तरी मंगळवारी पुन्हा दोघे वर्गात समोरासमोर आले असता जुन्या वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीत झाले. काही क्षणांतच ही चकमक हाणामारीत बदलली.
या झटापटी दरम्यान एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार केल्याने तो जखमी झाला. डोक्याला जबर मार बसल्याने जखमी विद्यार्थी रक्तबंबाळ झाला. प्रकार घडताच शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनेनंतर जखमी विद्यार्थ्याला तातडीने सातपूर परिसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या जखमी विद्यार्थ्याची प्रकृती सध्या स्थिर असून पुढील उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाळेत धाव घेतली. पोलिसांकडून उपस्थित शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून हाणामारीचे नेमके कारण काय, तसेच लोखंडी वस्तू शाळेत कशी आणली गेली, याचा तपास केला जात आहे. या घटनेमुळे शाळेतील शिस्त व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.