नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगून एका महिलेसह पाच जणांना 33 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणार्या सायबर भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की 32 वर्षीय फिर्यादी महिला ही नाशिक परिसरात राहते. एका अनोळखी इसमाने मोबाईल फोनद्वारे, फेसबुक व व्हॉट्सअॅपद्वारे फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. महिलेला विश्वासात घेऊन सरकारी नोकरी लावून देतो, असे सांगून रेल्वेत नोकरी लावून दिल्याचे रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाचे खोटे व बनावट ऑर्डर्स देऊन त्याद्वारे फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर अज्ञात इसमाने फिर्यादी महिलेसह तिच्या ओळखीच्या चार व्यक्तींना सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन करून एकूण 32 लाख 98 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.
हा प्रकार दि. 14 डिसेंबर 2024 ते 10 नोव्हेंबर 2025 या कालावधीत इंटरनेट, मोबाईल फोन, फेसबुक व व्हॉट्सअॅपद्वारे घडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.