छत्रपती संभाजीनगर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. वाशिमच्या पेडगाव या गावाजवळ ट्रक आणि ट्रॅव्हल्सची धडक झाली आहे. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून २० प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , हा अपघात आज (२३ जुलै) सकाळी सातच्या सुमारास घडल्याचे म्हटले जात आहे. छत्रपती संभाजीनगर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरच्या पेडगाव येथे हा भीषण अपघात झाला. ट्रकचा टायर अचानक फुटला आणि त्यानंतर ट्रक समोरुन येणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या बसला जोरात जाऊन धडकला.
या अपघातातील जखमींवर वाशिम, शेलू बाजार आणि कांजारा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात ३ ते ४ जण गंभीररित्या जखमी झाले होते. तर १५ ते २० जणांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. अपघाताग्रस्तांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.