जवळपास गेल्या अडीच-तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची आज सुनावणी होती. आज न्ययालयाकडून एकदाचा काय तो निर्णय लागेल अशी अपेक्षा अनेकांकडून करण्यात येत होती. आज अंतिम सुनावणी होणार असल्याचंही बोललं जात होत मात्र तारीख पे तारीख हे धोरण पुन्हा एकदा न्यायालयाने अवलंबल्याचे दिसत आहे.

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद करण्यास सुरूवात देखील केली होती. पण कपिल सिब्बल यांनी युक्तीवादासाठी आणखी वेळ मागितला यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. कोर्टाने थेट पुढच्या महिन्यात सुनावणी घेणार असल्याचे सांगितले.
ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलांसंदर्भात एक महत्त्वाचे प्रकरण सुनावणीला आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली. त्यामुळे आजही सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत अंतिम युक्तिवाद होऊ शकला नाही. आता १२ आणि १३ नोव्हेंबरला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
आजच्या सुनावणीपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला तुमच्या प्रकरणाची सुनावणी थोडक्यात होईल, असे स्पष्ट केले होते. यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुनावणी शक्य नसेल तर पुढची तारीख द्या, अशी विनंती केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरची तारीख दिली. त्यामुळे याप्रकरणाची पुढील सुनावणी 12 नोव्हेंबरला होईल. शिंदे गटाकडे सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह असल्याने त्यांना सुनावणीची फारशी घाई नाही. त्यामुळे शिंदे गटाने याप्रकरणाची सुनावणी डिसेंबर महिन्यात घेतली तरी चालेल, असे म्हटले.