चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयात झालेल्या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. येथील ५५ वर्षीय शेतकरी परमेश्वर मेश्राम यांनी भद्रावती तहसील कार्यालयात २६ सप्टेंबरला विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात परमेश्वर मेश्राम यांचा उपचारदरम्यान काल मृत्यू झाला. आता या प्रकरणात मेश्राम यांच्या कुटुंबियांना खासदार प्रतिभा धानोरकर आणि दिवंगत बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

दिवंगत बाळू धानोरकर यांच्याशी २००६ मध्ये जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्यामुळे परमेश्वर मेश्राम यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूस काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि अनिल धानोरकर जबाबदार आहे, असा कुटुंबियांनी आरोप केलाय. बाळू धानोरकर यांनी जमीन विक्रीचे पैसे दिले नाही आणि त्यांनी दिलेले चेक वारंवार बाउन्स झाले. त्यामुळे आमच्या शेत जमिनीचा सातबारा आमच्या नावावर करावा, धानोरकर कुटुंबीयांकडून ताबा मिळवून द्यावा आणि पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.
धानोरकर कुटुंबियांच्या दबावामुळे कोर्टात केस जिंकूनही जमीन त्यांच्या नावावर होत नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. जमिनीचा सातबारा आमच्या नावावर करण्यात यावा, अन्यथा परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. या मागणीमुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कुटुंबियांच्या या भूमिकेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
जमिनीच्या केसचा निकाल मेश्राम यांच्या बाजूने लागून देखील गेल्या 2 वर्षांपासून तहसील कार्यालयातून परमेश्वर मेश्राम नावे फेरफार करण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या मेश्राम यांनी तहसील कार्यालयातच टोकाचे पाऊल उचलले होते. या प्रकरणी भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांच्यावर 3 ऑक्टोबरला निलंबनाची कारवाई देखील झाली आहे.