दैनिक भ्रमर : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तालुक्यातील देवळाणे येथील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुसाईड नोट लिहून १९ वर्षीय यशराज रवींद्र बोर्डे याने आत्महत्या केली आहे. यशराज काही दिवसांपासून बेपत्ता होता. पोलिस शोध घेत असताना गुरुवारी (ता. २१) सकाळी शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या आत्महत्येने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे ही वाचा
१९ वर्षीय यशराज बोर्डे याने ऑनलाईन गेम पब्जीच्या आहारी जाऊन हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. पब्जी गेमच्या नादात तरुणाने अशाप्रकारे जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. पण आता पोलिसांनी यशराजच्या मृत्यूबाबत वेगळाच संशय व्यक्त केला आहे.
हे ही वाचा
आत्महत्येपूर्वी यशराजने आपल्या वहीत 'मी पाच वर्षांपूर्वीच मरण पावलो आहे, फक्त शरीर जिवंत आहे...' अशा शब्दांत आपली व्यथा मांडली आहे. चिठ्ठीचा उल्लेख करत त्याला मोबाइल गेमचे व्यसन असल्याचे त्याचे काका भास्कर बोर्डे यांनी सांगितले. मात्र मोबाइल गेममुळेच आत्महत्या घडली असे अद्याप निश्चित झाले नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हा प्रकार मानसिक तणावातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.