लॉ कॉलेजमध्ये रक्ताचा सडा , तरुणाने मैत्रिणीवर झाडली गोळी, नंतर स्वत:लाही संपवलं
लॉ कॉलेजमध्ये रक्ताचा सडा , तरुणाने मैत्रिणीवर झाडली गोळी, नंतर स्वत:लाही संपवलं
img
वैष्णवी सांगळे
सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन वीकचा फीवर सुरु असताना पंजाबमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉ कॉलेजच्या आवारात एका तरुणाने क्लासरुमध्ये तरुणीची गोळी घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ग सुरू होताच एका तरुणाने आपल्या क्लासमेट असलेल्या मैत्रिणीवर गोळी झाडून तिची हत्या केली. त्यानंतर त्याच पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडत त्याने आत्महत्या केली. ही संपूर्ण घटना कॉलेजमधील CCTV मध्ये कैद झाली असून या घटनेमुळे महाविद्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यात ही एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. उसमा गावातील 'माई भागो लॉ कॉलेज'मध्ये क्लास सुरू होताच एका विद्यार्थ्याने आपल्याच क्लासमेटची गोळ्या झाडून हत्या केली आणि क्षणार्धात स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. संदीप कौर असं मृत विद्यार्थिनीचं नाव असून हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याची ओळख प्रिन्स राज अशी आहे.

घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याप्रमाणे प्रिन्स राज वर्गात प्रवेश करतो आणि तिथे बसलेल्या संदीप कौरच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडतो. त्यानंतर लगेच तो पुन्हा पिस्तूल लोड करतो आणि स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतो. या गोळीबारात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

डीएसपी (DSP) जगबीर सिंह यांनी सांगितलं की, जसा क्लास सुरू झाला, तशीच ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्रिन्स राजने कॉलेजमध्ये इतकं भयानक पाऊल का उचललं, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडलं की काही जुन्या वैमनस्यातून, यादृष्टीने पोलीस कुटुंबीय आणि इतर वर्गमित्रांची चौकशी करत आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group