एक कार ३ मृतदेह, हत्या की आत्महत्या ? परिसरात खळबळ
एक कार ३ मृतदेह, हत्या की आत्महत्या ? परिसरात खळबळ
img
वैष्णवी सांगळे
दिल्लीच्या पीरागढी भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  पीरागढी याठिकाणी उड्डाणपुलाजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये तिघांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी पोलिसांना घटना कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये  दोन पुरूष आणि एका महिलेचा मृतदेह आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीरागढी उड्डाणपुलाजवळ एक कार अनेक तासांपासून उभी होती. कार एकाच ठिकाणी बराच वेळ उभी असल्याने काहींना संशय आला. त्यानंतर काही व्यक्तींनी कारच्या आत पाहिले असता त्यांना तीन जण बेशुद्ध अवस्थेत दिसले. वारंवार कारच्या काचांवर ठोठावूनही तिघेही जागे झाले नाहीत तेव्हा घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गाडी अनलॉक केली. तेव्हा या तिघांचाही मृत्यू झाल्याचे समोर आले.

पोलीस तपासात तिघांच्याही शरीरावर कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. त्यांच्या वस्तू देखील नीट होत्या त्यामुळे चोरीच्या उद्देशाने काही घडले असावे याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आत्महत्या किंवा गुदमरून त्यांचा मृत्यू झाला या दृष्टिकोनातून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांना विषबाधा किंवा आत्महत्या असल्याचा संशय आहे. पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच तिघांच्या मृत्यूचे खरे कारण उघड होईल. 

कारमध्ये मृत आढळलेल्या तीन जणांपैकी एकाची ओळख पटली आहे आणि इतर दोघांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकाचे वय अंदाजे ६० वर्षे आहे. एक पुरूष आणि एक महिला या दोघांचे वय अंदाजे ४० वर्षे असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले असून ते तपास करत आहेत. कारमधून कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत आणि फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group