नवी दिल्ली: अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला (AAP) राष्ट्रीय राजकारणात आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या १० राज्यसभा खासदारांपैकी ७ खासदारांनी बंडखोरी करत भाजपचे 'कमळ' हाती घेतले असून, तांत्रिकदृष्ट्या 'आप'च्या संसदीय गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण केल्याची घोषणा केली आहे.
खासदार राघव चढ्ढा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोठ्या राजकीय भूकंपामुळे दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलीनीकरणासाठी आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश बहुमताचा आकडा (१० पैकी ७ सदस्य) पूर्ण झाल्याने, या खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार राहणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे, 'आप'चे खासदार संजय सिंह यांनी याला भाजपचे 'खालच्या दर्जाचे राजकारण' आणि 'गद्दारी' संबोधत पंजाबची जनता या नेत्यांना कधीही माफ करणार नाही, असा संतप्त इशारा दिला आहे. त्यामुळे
अरविंद केजरीवाल यांच्या आम आमदी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
आपच्या राज्यसभेच्या 10 पैकी 7 खासदारांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानं मोठी खळबळ उडाली. खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha), अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी काल (24 एप्रिल) पत्रकार परिषद घेत पक्ष सोडत असल्याचं जाहीर केलं.
त्यांच्यासोबतच हरभजन सिंग,विक्रम सहानी, स्वाती मालीवाल,राजेंद्र गुप्ताही आपला रामराम ठोकणार असल्याचं चढ्ढा यांनी जाहीर केलं. तसेच आपची साथ सोडतानाच राज्यसभेत आम आदमी पक्षाचे भाजपात विलीनीकरण करण्यात आल्याचं राघव चढ्ढांनी सांगितलंय.
राघव चढ्ढा, अशोक मित्तल आणि संदीप पाठक यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेशही केला आहे. आता आपच्या भाजपात विलीनीकरणावर महत्वाची माहिती समोर आली आहे.
आपच्या राज्यसभेत विलीनीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे खासदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. राज्यसभा सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विलीनीकरणाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत.
आप (AAP) खासदारांच्या पत्रात सात सदस्यांची यादी आहे, हे पत्र भाजपकडे प्राप्त झाले आहे आणि त्याची औपचारिकपणे दखल घेण्यात आली आहे. संपूर्ण प्रक्रिया राज्यसभा अध्यक्षांनी देखील मंजूर केली आहे.दहाव्या अनुसूचीच्या तरतुदींनुसार, विलीनीकरणासाठी दोन-तृतीयांश बहुमत आवश्यक आहे. सध्याच्या प्रकरणात ही अट पूर्ण झाली आहे, त्यामुळे अपात्रतेचा प्रश्न उद्भवत नाही.
राज्यसभेत 'आप'चे 10 खासदार आहेत, त्यापैकी दोन-तृतीयांश, म्हणजेच सात, आमच्यासोबत आहेत.
राघव चड्ढा, संदीप पाठक, राजेंद्र गुप्ता, विक्रम साहनी, स्वाती मालीवाल, हरभजन सिंग, अशोक मित्तल
आप करणार या तीन खासदारांविरोधात तक्रार दाखल
आम आदमी पक्षाने (आप) याला नियमांचे उल्लंघन म्हटले आहे. 'आप'चे राज्यसभा प्रतोद एन. डी. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, ते राघव चड्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्या विरोधात राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र सादर करणार आहेत. या तिन्ही नेत्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळे 'आप'चे राज्यसभा प्रतोद या तिन्ही खासदारांविरुद्ध तक्रार दाखल करतील. हरभजन सिंग, स्वाती मालीवाल, विक्रम साहनी आणि राजिंदर गुप्ता यांनी अद्याप भाजपमध्ये सामील झाल्याचे जाहीर केलेले नाही.
काय म्हणाले आम आदमी पार्टीचे संजय सिंह
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं ऑपरेशन लोटस हे खालच्या दर्जाचं राजकारण असून पंजाबमधील भगवंत मान यांच्या सरकारला रोखण्याचं काम सुरु केलं आहे. पंजाबची जनता भाजपमध्ये जाणाऱ्या खासदारांना माफ करणार नाही, असं आपचे खासदार संजय सिंह म्हणाले.
आम आदमी पार्टीच्या राज्यसभेच्या 7 खासदार फोडून भाजपमध्ये सामील केली. या 7 नावांना पंजाबच्या जनतेनं लक्षात ठेवलं पाहिजे. या लोकांना पंजाबची जनता कधी माफ करणार नाही. पंजाबच्या लोकांनी, पंजाबच्या जनतेनं यांच्यावर प्रेम केलं आणि राज्यसभेत पोहोचवलं, आता ते भाजपच्या कुशीत पोहोचले आहेत.
संदीप पाठक यांना पंजाबच्या जनतेच्या प्रेमामुळं राज्यसभेत जाता आलं, असं संजय सिंह म्हणाले. भाजपनं इलेक्टोरल बाँडमध्ये भ्रष्टाचार केला, भाजप देशातील सर्वात भ्रष्ट पार्टी आहे, त्या पार्टीत सामील होत तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत असल्याचं सांगताय, तुमच्या गोष्टी कोण मान्य करेल, असा सवाल संजय सिंह यांनी केला.
आपवर आणि पंजाबच्या जनतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या गद्दारीचं उत्तर पंजाबचे लोक देतील, असं संजय सिंह म्हणाले.