दैनिक भ्रमर : सध्या मुंबईत कबुतरखान्यावरुन वाद सुरु असतानाच दुसरीकडे दिल्लीत-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाने प्राणीप्रेमी नाराजी व्यक्त करत आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली-एनसीआरमधील सर्व भटक्या कुत्र्यांना डॉग शेल्टर होममध्ये पाठवण्याचा आदेश दिला होता. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे आणि रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढल्यामुळे कोर्टाने हा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला प्राणीप्रेमी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार विरोध करण्यात आला.
११ ऑगस्ट रोजी कुत्र्यांच्या चावण्यामुळे होणारे रेबीजचे मृत्यू लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआरमधील सर्व कुत्र्यांना आश्रयगृहात पाठवण्याचा निर्देश दिला होता. त्यावेळी न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने कठोर शब्दांत म्हटलं होतं की, ‘रेबीजमुळे जीव गमावलेल्या लोकांना डॉग लव्हर्स परत आणू शकतात का? असा सवाल कोर्टाने केला होता.
दरम्यान कोर्टाच्या या निर्देशानंतर प्राणी कार्यकर्त्यांनी कुत्र्यांना दत्तक घेण्याची तयारी दाखवली. पण कोर्टाने ते मान्य केले नाही. भटके कुत्रे एका रात्रीत पाळीव होऊ शकत नाहीत, असे कोर्टाने स्पष्ट केले. कोर्टाने याबद्दल राज्य सरकार आणि महानगरपालिकांना एक हेल्पलाइन नंबर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. कुत्रे चावल्याची तक्रार आल्यास चार तासांत त्या कुत्र्याला पकडून त्याची नसबंदी आणि लसीकरण करून त्याला डॉग शेल्टर होममध्ये पाठवावे, असे आदेश दिले आहेत. या आदेशात कोणीही अडथळा आणल्यास तो सुप्रीम कोर्टाचा अवमान मानला जाईल, असेही कोर्टाने म्हटले आहे.