नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील करोल बाग परिसरात एक घर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीचा काही भाग कोसळला असून काही लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. सध्या शोध आणि बचाव कार्य करण्यासाठी दिल्ली अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दिल्ली अग्निशमन दलाला आज सकाळी ९.११ वाजता एक इमारत कोसळल्याची माहिती फोनद्वारे देण्यात आली. सध्या दिल्लीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडथळे येत आहेत.
करोल बाग परिसरात सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. घर कोसळून त्याखालील ढिगाऱ्यात सहा जण अडकल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. अग्निशमन दलासह दिल्ली पोलिसांचे पथकही बचावकार्यासाठी घटनास्थळी हजर आहे. घटनास्थळाच्या आसपासच्या परिसरातून स्थानिक लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. या घटनेने परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.