दिल्लीत कडाक्याच्या उन्हामुळे आगीच्या घटनाही समोर येत आहेत. अशातच केंद्रीय सचिवालयाच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या गृह मंत्रालयाच्या कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी (16 एप्रिल) सकाळी आग लागली. त्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली.
दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि सकाळी ९.३५ पर्यंत आग आटोक्यात आणण्यात आली.
याबात मिळालेल्या माहितीनुसार गृह मंत्रालयाच्या कार्यालयातील आयसी विभागात दुसऱ्या मजल्यावर सकाळी 9.20 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी 9.35 वाजेपर्यंत आग आटोक्यात आणली.
दरम्यान, ही आग एसीच्या युनिटमधून लागल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत एसी, झेरॉक्स मशिन, काही संगणक आणि काही कागदपत्रांसह पंखेही आगीने जळून खाक झाल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
ज्या कार्यालयात ही आग लागली ते आयकर विभागाचे कार्यालय असल्याचे सांगण्यात आले. आग लागली तेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह इमारतीत उपस्थित नव्हते, परंतु अनेक वरिष्ठ अधिकारी तेथे उपस्थित होते.