मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. गुरुवारी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी सहकुटुंब दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार गटातील आमदार आणि खासदारांमध्ये चलबिचल सुरु झाल्याची माहिती आहे. दिल्लीत 4 डिसेंबरला शरद पवार गटाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत आपण सत्तेत गेले पाहिजे, असा मतप्रवाह दिसून आला होता.
मात्र, शरद पवार गटात यावरुन दोन गट पडल्याची माहिती आहे. शरद पवार गटाने आपले स्वतंत्र अस्तित्व ठेऊन भाजपसोबत सत्तेत सामील व्हावे, असे एका गटाचे म्हणणे आहे. तर दुसरा गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याच्या मताचा आहे.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार आणि खासदार हे आता सत्तेत सामील होण्याच्या बाजूने दिसत आहेत. तसे झाल्यास राज्यातील महाविकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येईल. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
शरद पवार गट आणि भाजपमधील ही सगळी बोलणी दिल्लीत सुरु आहेत. अशातच काल अदानी यांच्या घरी झालेल्या बैठकीत भाजपच्या केंद्रीय नेत्याने शरद पवार यांच्या गटातील नेत्याकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि आगामी काळातील शरद पवार गटाची भूमिका याबाबत माहिती घेतल्याचे समजते. या नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली.
गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाच खासदार अजितदादा गटात सामील होतील, अशी चर्चा सुरु होती. या चर्चेचे मूळ आणि पडद्यामागील घडामोडी आता एक-एक करुन समोर येताना दिसत आहेत.
मात्र, शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल. शरद पवार हे भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यास महाराष्ट्रातील राजकारणाची रचना पुन्हा एकदा बदलेल.