'मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या', तरुणाचं शरद पवारांना साकडं ; तरुणाच्या निवेदनाची पवारांकडून दखल
'मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या', तरुणाचं शरद पवारांना साकडं ; तरुणाच्या निवेदनाची पवारांकडून दखल
img
वैष्णवी सांगळे
ग्रामीण भागात मुलांचं लग्न हा दिवसेंदिवस गंभीर विषय बनत चालला आहे. त्यात तरुण मुलगा जर शेतकरी असेल तर हा प्रश्न आणखी गंभीर होऊन बसतो.  मुलगी सुशिक्षित असो किंवा नसो पण मुलीसोबत मुलींच्या आई वडिलांच्या मागण्या पाहता मुलगा आणि त्याचे आईवडील हतबल असतात.  त्यात मुलगा शहरात असावा हि सर्वसाधारण मागणी मुलीच्या कुटुंबियांकडून असल्याने ग्रामीण भागातील मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. 

नुकतंच अकोल्यातील एका तरुणांनं  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्र लिहून ' मला लग्नासाठी मुलगी मिळवून द्या मी तुमचे उपकार विसरणार नाही ' असं साकडं घातलं. कान्हेरी सरपंच येथील शेतकरी संवाद कार्यक्रमानंतर एका 34 वर्षीय पठ्यानं शरद पवारांना लग्नासाठी पुढाकार घेण्याचं निवेदन दिल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आता कामाला लावलं आहे .



हे पत्र दुसऱ्या दिवशी मुंबईत शरद पवारांनी जयंत पाटलांसह आपल्या इतर नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दाखवलंय .या पत्रावर चर्चा झाली आहे . या तरुणासाठी जे करता येईल ते करा अशा सूचना शरद पवारांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यात .

काय लिहिलं आहे पत्रात?
आदरणीय साहेब!, माझे वय वाढत आहे. मी आता 34 वर्षांचा आहे. भविष्यात माझे लग्न होणार नाही. मी एकटाच राहील. तरी, माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायलाही मी तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालविण्याची हमी देतो. साहेब!, मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. 

लग्नाळू तरुणांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 
डिसेंबर २०२२ मध्ये सोलापूर मध्ये लग्नाळू तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. फेटा, मुंडावळ्या, वाजंत्री आणि घोड्यावर बसलेले २५ पेक्षा अधिक तरुण नवरी मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आले होते. तर नागपुरातही अधिवेशन काळात दोन वर्षांपूर्वी एका तरुणाने लग्न व्हावं, या प्रश्नावरून आंदोलन केलं होतं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group