राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडलं आहे. आता शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाच्या नेतृत्वाची धुरा दिली आहे. आज शशिकांत शिंदे यांनी पदभारही स्वीकारला आहे.
अशातच आता जयंत पाटलांना महायुतीकडून ऑफर आली आहे. एका बड्या नेत्याने जयंत पाटलांनी महायुतीसोबत आलं पाहिजे असं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
रामदास आठवलेंनी दिली ऑफर
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जयंत पाटलांना महायुतीत येण्याची ऑफर दिली आहे. जयंत पाटील यांचे तिकडे मन लागत नसेल किंवा त्यांना मार्ग बदलायचा असेल तर त्यांनी महायुती सोबत आले पाहिजे असं आठवले यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना आठवले यांनी म्हटले की, ‘जयंत पाटील हे संघर्षशील नेते आहेत. त्यांनी राजीनामा दिला आहे, त्यांना विकास करायचा असेल तर सत्तेसोबत आलं पाहिजे. राष्ट्रवादी सोडणार असाल तर मी मध्यस्थी करून त्यांना महायुतीत आणायला करायला तयार आहे’ असंही आठवले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता जयंत पाटील आठवलेंची ऑफर स्वीकारणार का? हे पाहणं म्हत्वाचं ठरणार आहे.