नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रभाग क्रमांक २९ मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे.
सुरुवातीला भाजपकडून मुकेश शहाणे आणि दीपक बडगुजर या दोघांनाही उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, दीपक बडगुजर यांनी आधी एबी फॉर्म भरल्यामुळे मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म बाद झाला. त्यामुळे अधिकृत उमेदवार म्हणून दीपक बडगुजर यांचे नाव निश्चित झाले.
आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत मुकेश शहाणे यांनी माघार न घेता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या कारणावरून भाजपने मुकेश शहाणे यांना पक्षातून सहा वर्षांकरिता निलंबित करण्यात आले.
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता मतदानाच्या आदल्या दिवशी नाशिकमधील प्रभाग 29 मध्ये ट्विस्ट निर्माण झाला आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांना पाठिंबा जाहीर केला.
उबाठा आणि मनसेकडून याबाबतचे अधिकृत पत्रही प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यामुळे प्रभाग 29 मधील निवडणुकीत अधिक रंगत निर्माण झाली आहे. मतदार मात्र कोणाला साथ देतात हे 16 तारखेला स्पष्ट होणार आहे.