भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत आज मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा शेवट भाजपला बसलेल्या धक्क्याने झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी यांनी बंडखोरी करत काँग्रेसप्रणीत 'सेक्युलर फ्रंट'च्या पाठिंब्यावर महापौरपदी विजय मिळवला आहे.
महापौर पदासाठी नारायण चौधरी यांना एकूण ४८ मतं मिळाली. या निकालानुसार मुस्लीम बहुल परिसरामध्ये नारायण चौधरी हे महापौर असणार आहेत. तर कोणार्क आघाडीचे उमेदवार विलास रघुनाथ पाटील यांना २५ मतं तर भाजप उमेदवार स्नेहा पाटील यांना एकूण १६ मतं मिळाली.भाजपने १८ फेब्रुवारी रोजी नारायण चौधरी यांना डावलून ऐनवेळी स्नेहा पाटील यांना महापौरपदाची अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती.
पक्षाच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी आपल्या ७ ते ८ समर्थक नगरसेवकांसह स्वतंत्र गट स्थापन केला आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली. भिवंडी महापालिकेत सहसा अल्पसंख्याक समाजाचा महापौर होण्याची परंपरा राहिली आहे, पण यंदा काँग्रेसने राजकीय रणनीती बदलत भाजपच्याच बंडखोर नेत्याला महापौर पदाची संधी देऊन भाजपला मोठा धक्का दिला.