मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे नवनिर्वाचित नगरसेवकांकडे उद्धव ठाकरेंचे बारीक लक्ष असताना दुसरीकडे धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याच्या भाजप प्रवेशाने ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापतींनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माजी उपासभापतीच्या भाजप प्रवेशाने धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे विश्वासू धाराशिव पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे धाराशिव तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीचे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.
तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गोर्डे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिंदेसेनेचे नेते संदिपान भुमरेंचे कट्टर विरोधक म्हणून दत्ता गोर्डे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये घेऊन भाजपकडून एकप्रकारे भुमरेंची कोंडी केली जात असल्याची देखील चर्चा आहे.