बीड येथील कला केंद्रातील नर्तकीच्या नादाला लागून उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण राज्यभरात चांगलंच गाजलं. आता धाराशिवमध्ये देखील असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धाराशिवमध्ये नर्तकीच्या नादाला लागून २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. अश्रुबा कांबळे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर अश्रुबा कांबळेची आत्महत्या नाही, तर हत्या झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
धाराशिव येथील साई कला केंद्रातील नर्तकीचे अश्रुबा कांबळे या तरुणासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. नर्तकीसोबतच्या प्रेम संबंधामुळे अश्रुबा कांबळेची पत्नी त्याला सोडून गेली. घरातील सोनं पैसे दिले. पोस्टातील आरडी मोडून अश्रुबा कांबळेने तिला पैसे देखील दिले, दरम्यान महिलेसोबत प्रेमसंबंधातून वाद झाले होते. यानंतर अश्रुबा कांबळेने गळफास घेऊन जीवन संपवले.
नेमकं प्रकरण काय आहे?
धाराशिव जिल्ह्यात साई कला केंद्र आहे. येथे पूजा उर्फ आरती धम्मपाल वाघमारे ही महिला नृत्यकाम करते. अश्रूबा अंकुश कांबळे नावाचा 25 वर्षीय तरुण या महिलेच्या प्रेमात होता. गेल्या पाच वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. दोघे अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायचे. अश्रूबा कांबळे हा रुई ढोकी या गावचा रहिवासी होता. कला केंद्रात काम करणारी महिला आणि अश्रूबा कांबळे हे 8 डिसेंबर रोजी शिखर शिंगणापूर येते देवदर्शनाला गेले होते. पण परत येताना त्यांच्यात वाद झाला होता. हाच वाद नंतर वाढत गेला आणि यातूनच अश्रूबा या 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नेमका वाद का झाला ?
अश्रूबा आणि कलाकेंद्रात काम करणार नर्तकी शिंगणापूरहून परतत होते. याच वेळी अश्रूबा कांबळे या तरुणाला त्याच्या पत्नीचा फोन आला. त्यानंतर नर्तकी आणि अश्रूबा यांच्यात वाद झाला. हा वाद चालू असतानाच मी आत्महत्या करतो म्हणून अश्रूबा यांनी धमकी दिली होती. परंतु प्रेयसी नर्तकीने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर या तरुणाने चोरखळी येथे गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर आता नर्तकी पूजा उर्फ आरती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.