नागपुरात गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. नागपूरच्या गोधनी रेल्वे परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या २३ वर्षांच्या एका तरुणीची तिच्या शेजारी राहणाऱ्या ३८ वर्षीय नराधमाने निर्घृणपणे हत्या केली. प्राची खापेकर असे या तरुणीचे नाव आहे. तर शेखर ढोरे असे नराधमाचे नाव आहे. आरोपी शेखर हा विवाहित असून मृत प्राचीचा शेजारी होता.
प्राची खापेकर ही गोधणी येथील कलेक्टर कॉलनीमधील राजलक्ष्मी सोसायटीत कुटुंबासह राहत होती. ती बी.ए.चे शिक्षण घेत होती. त्याचसोबत आरोपी शेखर ढोरे याच्या पत्नीबरोबर शिवणकामाचे कामही करत होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत शेखरने प्राचीशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला.शेखर हा गेल्या अनेक दिवसांपासून प्राचीला फॉलो करत होता. त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, प्राचीने त्याला नकार दिला होता.
त्याचा हेतू लक्षात येताच प्राचीने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती. हीच गोष्ट शेखरला सहन न झाल्याने मंगळवारी सकाळी, प्राचीच्या घरात कोणीही नसताना तो तिच्या घरी आला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि रागाच्या भरात शेखरने प्राचीचा गळा दाबून तिची हत्या केली. प्राचीचा मृत्यू झाल्याची खात्री होताच, शेखरने ओढणीचा फास बनवून तिचा मृतदेह सिलिंग फॅनला लटकावला आणि आत्महत्येचा बनाव रचत घटनास्थळावरून फरार झाला.
काही वेळाने प्राचीचे कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ मानकापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात प्राचीच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याचे तसेच गळ्यावर खुणा आढळून आल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झाले.
पोस्टमार्टम रिपोर्टमधून शेखर याचा भंडाफोड झाला. यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलत संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या शेखर ढोरे याला ताब्यात घेतले. कडक चौकशीनंतर शेखरने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या झाल्याने मानकापूर आणि गोधणी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.