अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला शहरातील उमरी परिसरात समलिंगी नात्यातील संशय आणि वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
या घटनेत 30 वर्षीय अनिकेत (नाव बदलले आहे) या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत राहणाऱ्या नितेश अरुण जंजाळ (रा. संजय नगर, मोठी उमरी) याने हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी नितेशला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत (नाव बदलले आहे) आणि नितेश जंजाळ हे दोघेही मागील तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. सुरुवातीला चांगली मैत्री असलेल्या या दोघांचे नाते पुढे समलिंगी रिलेशनशिपमध्ये बदलले. मात्र, अलीकडील काही दिवसांपासून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. अमोल इतर कोणाशी संबंध ठेवत असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये भांडणे होत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून समोर आली आहे.
काल रात्रीही याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. रात्री उशिरा नितेशने बाहेरून जेवण आणल्यानंतर हा वाद अधिक वाढला आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पोलिस चौकशीत अनिकेतसोबत (नाव बदलले आहे) राहत असलेल्या नितेशने त्याची हत्या केल्याची बाब उघडकीस आली. प्राथमिक माहितीनुसार, लाठी-काठीने डोक्यावर आणि तोंडावर जोरदार वार करण्यात आल्याने मृत्यू झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.