विवाहबाह्य संबंधामुळे हत्या होत असल्याच्या अनेक घटना सध्या समोर येत आहे. अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये देखील घडली आहे. येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. झालेली ही हत्या इतकी क्रूर होती की पोलिसांनाही धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४८ वर्षीय लाकूडतोड मजूर कोलांजीला त्याच्या बायकोचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. त्याची ३७ वर्षीय बायको लक्ष्मीचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. तिला रंगेहाथ पकडण्यासाठी त्याने एक सापळा रचला. मंगळवारी रात्री बायकोला मी शहराबाहेर जात असल्याचे सांगून कोलांजी घराबाहेर पडला.
नवरा बाहेर गेल्यामुळे लक्ष्मीचा प्रियकर तिच्या घरी आला होता. त्यानंतर मध्यरात्री अचानक कोलांजी घरी परत आला. त्याने लक्ष्मीला तिच्या प्रियकरासोबत घराच्या टेरेसवर रंगेहाथ पकडले. बायकोला प्रियकरासोबत पाहिल्यावर संतप्त झालेल्या कोलांजीने दोघांची निर्घृण हत्या केली. त्याने धारधार शस्त्राने वार करत बायको आणि तिच्या प्रियकराचे शीर धडावेगळं केलं.
त्यानंतर त्याने दोघांचे शीर आपल्या दुचाकीला बांधले आणि वेल्लोर मध्यवर्ती कारागृहाच्या गेटवर जाऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आपण केलेल्या गुन्ह्याचा पुरावा पोलिसांना देण्यासाठी त्याने दोघांचे शीर आपल्यासोबत नेले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.आरोपीला तीन लहान मुली आहेत. वडिलांनी केलेल्या कृत्यामुळे या मुलांवरील आईचे छत्र हरपले तर वडीलही पोलिस कोठडीत असल्यामुळे मुलांनी टाहो फोडला.