पंजाबच्या मोहालीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कबड्डी सामना सुरु होण्याच्या काही मिनिटं आधी अज्ञातांनी एका कबड्डीपटूला गोळ्या झाडून संपवल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. हा गोळीबाराचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
बेदवान स्पोर्ट्स क्लबच्या चार दिवसीय कबड्डी स्पर्धेत सोमवारी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत स्पर्धेचे आयोजन कंवर दिग्विजय सिंह उर्फ राणा बलाचौरिया यांचा मृत्यू झाला आहे. कबड्डी स्पर्धेदरम्यान चाहते बनून आलेल्या दोन-तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने खळबळ उडाली.
राणा बालचौरिया यांच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या वरच्या भागात चार-पाच गोळ्या लागल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राणा बलाचौरिया स्वत: एक कबड्डीपटू आहे आणि त्यांनी बेदवान स्पोर्ट्स क्लबमध्ये स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
राणा बलाचौरिया यांचे लग्न अवघ्या 10 दिवसांपूर्वीच झाले होते. असे सांगितले जात आहे की हल्लेखोर सेल्फी काढण्याच्या बहाण्याने खेळाडूजवळ आले होते. याच दरम्यान त्यांनी गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी बंबीहा गँगने घेतली आहे. त्यांनी सांगितले आहे की, याने सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्यांना साथ दिली होती. आम्ही त्याच्या हत्येचा बदला घेतला आहे. घटनेचा अधिक तपस आता पोलिसांकडून सुरु आहे.