राजधानी दिल्लीच्या गांधी विहार परिसरात काही आठवड्यांपूर्वी गॅस सिलेंडरच्या स्फोटात युपीएससी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात वाटत होता मात्र पोलिसांच्या तपासामुळे या प्रकरणाचे अनेक धागे दोरे समोर आले आणि हा अपघात नसून योजना आखून केली गेलेली हत्या असल्याचं समोर आलं आहे.

धक्कदायक म्हणजे या 'मर्डर मिस्ट्री'ची सूत्रधार दुसरी-तिसरी कोणी नसून, फॉरेंसिक सायन्सची विद्यार्थिनी निघाली. पोलिसांच्या तपासणीत असे उघड झाले आहे की, तिने तिच्या माजी प्रियकर आणि एका मित्राच्या मदतीने युपीएससीची तयारी करत असलेल्या रामकेश मीना याची क्रूर हत्या केली आणि त्यानंतर आग लावून तो अपघात असल्याचे भासवण्याचा कट रचला.
६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी दिल्ली पोलिसांना गांधी विहारमधील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या टीमने आग विझवली, पण आतील दृश्य भयानक होते. आतमध्ये ३२ वर्षीय रामकेश मीनाचा भाजलेला मृतदेह आढळून आला. मृतदेहाची स्थिती आणि खोलीतील विखुरलेल्या वस्तूंमुळे पोलिसांना संशय आला.
गुन्हे अन्वेषण आणि एफएसएल टीमने घटनास्थळी तपासणी केली आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, सुमारे २:५७ वाजता अमृता चौहान नावाची मुलगी तिच्या साथीदारासह इमारतीतून बाहेर जाताना दिसली. काही मिनिटांनंतर आग लागली. पोलिसांनी अमृताच्या मोबाइलचा डेटा आणि कॉल रेकॉर्ड्स तपासले, तेव्हा तिचे लोकेशन त्याच रात्री गांधी विहारजवळ असल्याचे निश्चित झाले. यानंतर पोलिसांचा संशय खात्रीत बदलला.
१८ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी अमृता चौहानला मुरादाबादमधून अटक केली. चौकशीदरम्यान तिने आपला गुन्हा कबूल केला. तिने तिचे दोन मित्र सुमित कश्यप (माजी प्रियकर) आणि संदीप कुमार (पदवीधर, एसएससी उमेदवार) यांच्यासोबत मिळून हत्येचा कट रचल्याचे सांगितले.
अमृताने पोलिसांना सांगितले की, रामकेश मीना तिच्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. रामकेशने तिचे काही खासगी व्हिडिओ आणि फोटो एका हार्ड डिस्कमध्ये सेव्ह करून ठेवले होते. जेव्हा अमृताने ते डिलीट करण्याची मागणी केली, तेव्हा रामकेशने साफ नकार दिला. या रागातून अमृताने तिचा एक्स-बॉयफ्रेंड सुमितला ही गोष्ट सांगितली आणि दोघांनी मिळून हत्येची योजना आखली.
फॉरेंसिक सायन्सची विद्यार्थिनी असल्यामुळे अमृताला पुरावे कसे मिटवायचे याची पूर्ण माहिती होती. ५-६ ऑक्टोबरच्या रात्री तिघेही गांधी विहार येथे पोहोचले. त्यांनी आधी रामकेशचा गळा दाबला, नंतर काठीने मारहाण करून त्याची हत्या केली. त्याच्या मृतदेहावर तूप, तेल आणि वाईन टाकली, जेणेकरून आग वेगाने भडकावी. सुमितने सिलेंडरची नॉब उघडून गॅस पसरवला आणि आग लावली.
अमृताने दरवाजाची जाळी काढून आतून गेटला कुलूप लावले जेणेकरून तो अपघात भासावा. एलपीजी सिलेंडर वितरक असलेल्या सुमित कश्यपला गॅस सिलेंडर कधी आणि कसा फुटेल याची पूर्ण माहिती होती. त्याने सिलेंडरची नॉब उघडून, शवजवळ ठेवून आग लावली आणि बाहेर पडला. सुमारे एका तासानंतर मोठा स्फोट झाला आणि खोलीत आग भडकली. बाहेरच्या लोकांना हा सर्व प्रकार गॅस स्फोटामुळे घडलेला अपघात वाटला. १८ ते २३ ऑक्टोबर दरम्यान पोलिसांनी या तिन्ही आरोपींना मुरादाबाद येथून अटक केली. अमृताच्या ठिकाणाहून हार्ड डिस्क, ट्रॉली बॅग आणि मृताचा शर्ट जप्त करण्यात आला.