रायगडच्या खोपोलीतुन एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. खोपोली नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची आज (शुक्रवार, २६ डिसेंबर) सकाळी ७ वाजता निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
चार दिवसांपूर्वीच मानसी काळोखे खोपोवलीमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. पण या आनंदाला नजर लागली. काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी हल्लेखोरांना घटनास्थळाजवळ पाहिले असता हे हल्लेखोर काळया रंगाच्या वाहनातून आल्याची माहिती दिली. अज्ञात व्यक्तींनी मानसी काळोखे यांच्या पतीला रस्त्यात गाठले अन् जीव घेतला. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , मंगेश काळोखे हे नेहमीप्रमाणे मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेले होते. त्यांनी आपल्या मुलांना शाळेत सोडले. ते घराकडे परत येत होते. त्यावेळी त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. त्यात त्यांच्या मृत्यू झाला. या घटनेनंतर खोपोलीत एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काळोखेंची हत्या का केली? या हत्येमागे कोण आहे? याचा तपास खोपोली पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर खोपोलीत तणावाचे वातावरण आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा शोध घेतला जात आहे.