पुण्यातील २०१२ च्या प्रसिद्ध जे.एम. रोड साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीची बुधवारी दुपारी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अस्लम शब्बीर जहागीरदार उर्फ बंटी जहागीरदार असे या आरोपीचे नाव आहे. एका नातेवाईकाच्या अंत्यविधीहून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला.
गोळीबाराची ही थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या हत्येनंतर श्रीरामपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. मात्र, अटकेच्या भीतीने दोन्ही संशयित आरोपींनी रात्री उशिरा शिर्डी पोलिसांसमोर स्वतःहून आत्मसमर्पण केले. या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान १ ऑगस्ट २०१२ रोजी पुण्याच्या जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. या स्फोटातील संशयितांना शस्त्रे पुरवल्याच्या आरोपाखाली जानेवारी २०१३ मध्ये दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) बंटी जहागीरदारला अटक केली होती. तो २०२३ पासून जामिनावर बाहेर होता. त्याच्यावर १९९७ पासून आतापर्यंत तब्बल १७ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
बंटी जहागीरदारचे कुटुंब स्थानिक राजकारणातही सक्रिय आहे. त्याची आई श्रीरामपूर नगरपरिषदेची माजी सदस्य होती. तर त्याचे चुलत भाऊ रईस शेख जहागीरदार हे सध्या नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत.