लातूर जिल्ह्यातील औसा तहसीलमध्ये घडलेली घटना एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच आहे. इन्श्योरन्सचे पैसे मिळवण्यासाठी पट्ठ्याने असा काही डाव रचला की पोलिसांनाही मोठा धक्का बसला. बरं यासाठी त्याने एका निष्पापाचाही बळी घेतला. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या इसमाने इन्श्योरन्सचे १ कोटी रुपये मिळवण्यासाठी फक्त पोलिसांना चकमा दिला नाही, तर एक निरपुराध व्यक्तीचाही जीव घेतल्याचे उघड झालं.
लातूर जिल्ह्यातील औसा तहसील परिसरात ही घटना घडली. या परिसरातून जाणाऱ्या वानवाडा पाटी-वानवाडा रस्त्यावर पोलिसांना एक जळालेली कार आढळली. कारच्या आतून एका पुरूषाचा जळालेला मृतदेहही सापडला. सुरूवातीला पोलिसांना हे प्रकरण अपघाताचं वाटलं आणि त्यांनी तसा एनडीआक दाखल केला. तपासाअंती पोलिसांच्या असे लक्षात आले की ही कार औसा तांडा येथील रहिवासी बळीराम गंगाधर राठोड यांच्या नावावर रजिस्टर्ड होती. पण घटनेच्या दिवशी ही कार त्यांचे मेहुणे गणेश गोपीनाथ चव्हाण यांच्याकडे होती.
१३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास ते लॅपटॉप देण्याबद्दल सांगून घरातून निघाले, मात्र ते परत आलेच नाहीत.घटनास्थळी सापडलेल्या एका ब्रेसलेटवरून गाडीत सापडलेला मृतदेह गणेशचा असल्याचे ओळखण्यात आले. पण ही कहाणी तिथेच संपली नाही. तपासादरम्यान, पोलिसांसमोर काही तथ्यं उघडकीस आली, त्यामुळे पोलिसांनाही धक्काच बसला.
काही संशयास्पद गोष्टींमुळे क्राईम ब्रांचने पुन्हा तपास सुरू केला. त्यानंतर मोबाईल लोकेशन आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स यामुळे धक्कादायक सत्य उघड झालं. जो गणेश चव्हाण अपघाता मरण पावला असं लोकांना वाटतं होतं, तो खरंतर जिवंत होता. क्राईम ब्रांच टीमने सिंधुदुर्गमधून त्याला शोधून काढलं. त्यानतंर चौकशीदरम्यान गणेशने धक्कादायक कबूली दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा गेल्या काही महिन्यांपासून गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करत होता. त्याच्यावर अंदाजे ५७ लाखांचे कर्ज होते आणि त्याने तीन वर्षांपूर्वी १ कोटी रुपयांचा टर्म इन्श्योरन्स काढला होता. कर्जातून सुटका व्हावी म्हणून आणि कुटुंबाला हे पैसे मिळावेत म्हणून त्यानेच हा भयानक प्लान रचला. १३ डिसेंबरच्या रात्री तो औसा येथील यकटपूर रोड चौकात पोहोचला, जिथे त्याने दारू पिलेल्या गोविंद किशन यादव (वय 50) याला औसा किल्ल्यावर सोडण्यासाठी लिफ्ट दिली.
वाटेत ते एका ढाब्यावर थांबले, दोघांनी जेवण केलं आणि नंतर निर्जन वानवाडा रस्त्यावरून ते निघाले. कारमध्ये बसताच यादव झोपी गेला.तिथेच गणेशने त्याचा प्लान प्रत्यक्षात आणला. त्याने गोविंद यादवला ड्रायव्हरच्या सीटवर ओढले आणि तिथे बसवून त्याला सीटबेल्ट बांधला. त्यानंतर त्याने प्लास्टिकची पिशवी आत ठेवली, ती पेटवली आणि पेट्रोल टाकीचे झाकण उघडे ठेवून घटनास्थळावरून पळून गेला.
गाडीचा लागलेल्या आगीत यादवचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर गणेश हा घटनास्थळावरीन फरार होऊन तुळजापूरला पोहोचला, तिथून तो खासगी बसने कोल्हापूर आणि तिथून विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) येथे गेला. मात्र नशिबाने त्याची साथ दिली नाही. लातूर पोलिसांनी २४ तासांच्या आतच या प्रकरणाचा छडा लावत सत्य उघडकीस आणलं आणि गणेश याला अटक केली.