नवरा बायकोत किरकोळ कारणावरून वाद होत असतात. हे वाद काहीवेळाने शांत होतात पण काही वादाचा शेवट भयंकर होतो. बिहारमध्ये नवरा बायकोचा क्षुल्लक कारणावरून जाहलेला वाद टोकाला पोहोचला अन नवऱ्याने थेट बायकोलाच संपवलं. 
बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बिदुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एराजीकंचनपूर गावातून ही भयानक घटना उघडकीस आली आहे. गुन्हेगारी इतिहास असलेला अभिषेक कुमारने पत्नीच्या फेसबुक वापरामुळे तिला बेदम मारहाण करत ठार मारलं. दिव्या कुमारी (२७) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. ती एराजीकंचनपूर गावातील रहिवासी आहे. 
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बिदुपूर पोलिसांना माहिती दिली. बिदुपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी येऊन महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी हाजीपूर येथील सदर रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपी पती आणि त्याच्या वडिलांना याप्रकरणी अटक केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार फेसबुक वापरावरून झालेल्या वादातून तिचा पती अभिषेकने काल रात्री दिव्याला बेदम मारहाण केली, यामध्ये तिचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.