कल्याणमधून एक धकाकदायक घटना समोर आली आहे. भाच्यानंच मामाची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला काही तासांमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. 
प्राथमिक माहितीनुसार, मामा मारिअप्पा राजू नायर आणि भाचा गणेश पुजारी यांच्यामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतापलेल्या भाच्याने रागारागात मामाचं डोकं घरात असलेल्या एका लोखंडी शिडीला आदळलं. या झटापटीत मारिअप्पा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मारिअप्पा नायर यांच्या मृत्यूनंतर आरोपी गणेशने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी सापळा रचून कल्याण रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पळून जाण्याच्या एका तासाच्या आत त्याच्या मुसक्या आवळल्या.
दरम्यान आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या खडकपाडा पोलीस ठाण्यात आरोपी गणेश पुजारी याची चौकशी सुरु आहे. मात्र मामा भाच्यामधलं वादाचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही. प्राथमिक माहितीनुसार घरगुती वादातूनच ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनेचे नेमके कारण समजून घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.