किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरण ! निवृत्त पोलिस अधिकाऱ्यासह १० आरोपींना जन्मठेप, भाजप नेत्याच्या कुटुंबातील ५ जणांचा समावेश
किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरण ! निवृत्त पोलिस अधिकाऱ्यासह १० आरोपींना जन्मठेप, भाजप नेत्याच्या कुटुंबातील ५ जणांचा समावेश
img
वैष्णवी सांगळे
राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी (२१ जानेवारी) सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक श्रीराम गावंडे यांच्यासह १० आरोपिंना जन्मठेप सुनावण्यात आली आहे. आरोपींमध्ये भाजपच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील ५ जणांचा समावेश आहे. 

किसनराव हुंडीवाले हे अकोल्यातील प्रसिद्ध प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिक होते. ते केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे जवळचे नातेवाईक होते.६ मे २०१९ रोजी पोलिस अधिक्षकांच्या शासकीय बंगल्याच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक न्यास उपनिबंधक कार्यालयात किसनराव हूंडीवाले यांची हत्या करण्यात आली होती. आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिलेंडरच्या सहाय्याने त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहणीत गंभीर जखमी झालेल्या त्यांचा किसनराव यांचा मृ्त्यू झाला होता.

किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये अकोल्यातील भाजपच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबातील ५ जणांचा समावेश होता. यामध्ये सुमन गावंडे यांचे पती आणि निवृत्त पोलिस निरीक्षक श्रीराम गावंडे, मुलगा आणि भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम उर्फ छोटू गावंडे, रणजीत गावंडे, धीरज गावंडे, प्रल्हाद गावंडे, दिनेश राजपुत, प्रतीक तोंडे, विशाल तायडे, सतीश तायडे, मयूर अहिर, सूरज गावंडे या सर्वांचा समावेश आहे.

या हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम सरकारी पक्षाचे वकील होते. या प्रकरणाची अंतिम सुनावणी करताना न्यायालयाने १० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर फारसे पुरावे नसल्यामुळे ५ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या हत्या प्रकरणाची सुनावणी गेल्या ६ वर्षांपासून सुरू होती अखेर किसनराव हूंडीवाले यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group