काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावरती काल ( ६ जानेवारी ) अकोल्यामध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. अकोट तालुक्यातल्या त्यांच्या मोहाळा गावात हल्लेखोराने त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केला होता. उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मारेकरी फरार असून संशयित आरोपी उबेद पटेलला रात्री पणज गावातील लोकांनी पकडून दिलं आहे. याप्रकरणी काही राजकीय वर्तुळातील नेत्यांची नावे समोर आली आहेत, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांचं नाव समोर आलं आहे.
पटेल यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत मोठी नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. हिदायत पटेल यांच्यावरील हल्ल्याला कारणीभूत असल्याचा आरोप केलेल्या नावांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बुद्रूजम्मा, अकोटचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते संजय बोडखे, काँग्रेसचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती राजीव बोचे यांची आरोपींमध्ये नावे आहेत.
याशिवाय हल्लेखोर आरोपी उबेद पटेल आणि आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्यात मोठ्या राजकीय नेत्यांची नावे असल्याने अकोला जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हल्ला आणि कट रचल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता खुनाचा गुन्हा किती लोकांवर दाखल होतो? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
जुन्या वादाची पार्श्वभूमी
दरम्यान, २४ मे २०१९ रोजी भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे कार्यकर्ते मतीन पटेल यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल आहे. आजचा हल्लेखोर उबेद पटेल हा मृतक मतीन पटेल यांचा पुतण्या असून, काकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला केल्याची चर्चा आहे. सहा महिन्यांपूर्वी उबेद पटेल याने आत्महत्येचाही प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे.