विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेकडून ( ठाकरे गट ) ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही पक्षांनी ‘ईव्हीएम’च्याविरोधात आक्रमक, अशी भूमिका घेतली आहे.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरदचंद्र पवार ) खासदार सुप्रिया सुळे यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. ठोस माहितीशिवाय ‘ईव्हीएम’ला दोष देणार नाही, असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं आहे. त्या पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.
त्यामुळे एकीकडे काँग्रेस आणि ठाकरे गट ‘ईव्हीएम’वरून भाजपला लक्ष्य करत असताना सुप्रिया सुळे यांनी मित्रपक्षांच्या धोरणाला छेद देणारी भूमिका मांडल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
ईव्हीएम यंत्रात फेरफार झाल्याचे ठोस पुरावे हाती असल्याशिवाय मी दोषारोप करणे योग्य ठरणार नाही. मी याच ईव्हीएम यंत्रावर चार निवडणुका जिंकल्या आहेत. ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीतील घोळामुळे संशायस्पद वातावरण निर्माण झालं आहे. या सर्वांचा अभ्यास केला पाहिजे. या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ईव्हीएमबाबतच्या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर त्या गोष्टी बाहेर येतील, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.