राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना पक्षाच्या नावावरून आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू असलेला वाद आज निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (14 जुलै) या प्रकरणावर सुनावणी होणार आहे, त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत स्पष्ट मागणी केली आहे की, शिंदे गटाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरण्यास मनाई करावी. न्यायालयाने तात्पुरता आदेश देऊन निवडणूक आयोगाच्या 2022 च्या निर्णयाला स्थगिती द्यावी.
आजची सुनावणी केवळ याचिकेवरील प्राथमिक निर्णयासाठी असली तरी, या सुनावणीत न्यायालयाने तात्पुरता आदेश दिला, तर शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो. याच वेळी, न्यायालय जर ‘निर्णय राखून ठेवतो’ असं म्हणालं, तर पुढील निवडणुकांसाठी दोन्ही गटांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो.
न्यायालय तात्पुरता निर्णय देऊ शकतं, जसं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्ह अन् नावाच्या वादात दिला होता. अथवा न्यायालय दोन्ही गटांना दिलेल्या नाव व चिन्हांनुसारच निवडणुकीला सामोरे जाण्याचे निर्देश देऊ शकते. हा वाद 2022 पासून सुरू झाला आहे.
शिवसेनेने म्हटलं आहे की, शिंदे गटाने सत्तेच्या लालसेपोटी मूळ पक्षाशी गद्दारी केली. निवडणूक आयोगाच्या असंवैधानिक निर्णयामुळेच धनुष्यबाण व नाव लुटले गेले.आजच्या सुनावणीत तात्पुरता निर्णय जरी झाला, तरी तो निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतो.
आजचा दिवस शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गट दोघांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.