मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या पाच दिवसांनंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक १५७ मधून मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सरिता म्हस्के या शिंदेसेनेच्या गळाला लागल्याची माहिती आहे. एकीकडे कल्याण डोंबिवलीतील चार नगरसेवकांनी निवडून आल्यानंतर लगेच साथ सोडल्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत पहिला धक्का बसला आहे.
शिवसेना उबाठाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आज शिवसेना भवनात बैठक बोलावण्यात आली होती. पण त्या बैठकीला म्हस्के गैरहजर होत्या. ठाकरेसेनेचे सगळे नगरसेवक कोकण भवनात गट स्थापना करण्यासाठी गेले होते. तिथेही म्हस्के नव्हत्या, अशी माहितीही समोर येत आहे.
मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिंदे गट आणि भाजपकडून हालचालींना वेग आला असताना, इतर पक्षांतील नगरसेवकांशी संपर्क वाढवला जात असल्याची चर्चा आहे. प्रभाग 157 मधून निवडून आलेल्या डॉ. सरिता म्हस्के शिंदे यांनी ठाकरेंची साथ सोडल्याची माहिती आहे. सरिता म्हस्के या शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती आहे. ठाकरे गटाच्या सरिता म्हस्के यांनी प्रभाग क्रमांक 157 मधून भाजपच्या आशा तायडे यांचा पराभव केला आहे.
मुंबईत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. एकीकडे शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये महापौरपदासाठी चढाओढ असताना दोन्ही गटांकडून इतर नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात ठाकरेंच्या एक नगरसेविका शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती पुढे येत आहे.