महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती शुक्रवारी, २० फेब्रुवारी रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेने याबाबतची माहिती दिली आहे.
राज्यातील १६ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपत असल्याने किंवा संपल्यानंतर शासकीय कर्मचारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आल्याने गावांच्या विकासकामांना मोठा फटका बसत असल्याचा आरोप अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी केला आहे. शासनाच्या या धोरणाविरोधात २० फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायती एकदिवसीय लाक्षणिक संपावर जाणार असल्याची घोषणा परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
प्रशासक म्हणून सरपंचांची नियुक्ती करावी या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येतंय. त्यासोबतच जिल्हा नियोजन समितीत ग्रामपंचायतींचा प्रतिनिधी समाविष्ट करावा, सरपंच व उपसरपंच यांचे थकीत मानधन तातडीने द्यावे, विधान परिषद निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार द्यावा ग्रामपंचायतींमधील कॉम्प्युटर ऑपरेटरांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशा महत्त्वाच्या मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.