आज सिन्नर , अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, सोलापूरातील अनगर, मंगळवेढा, साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणसह 23 नगरपरिषदांमध्ये मतदान होत आहे. मतदारांचा सकाळपासून मोठा उत्साह पहायला मिळत आहे. मात्र मतदान होत असलेल्या काही ठिकाणी गौरप्रकार झाल्याने मतदानाला गालबोट लागल्याचं दिसून आलं.
सिन्नर येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान आज सकाळी ८. ३० वाजण्याच्या सुमारास शहरातील ब. ना. सारडा विद्यालय येथील मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा प्रयत्न वेळेत हाणून पाडण्यात आला.
मतदान प्रतिनिधींनी सतर्कता दाखवत कृष्णा सुनील निचळ (वय २५, रा. विजयनगर, सिन्नर) या इसमास दुसऱ्या व्यक्तीच्या नावाचे आधारकार्ड वापरून मतदान करताना रंगेहाथ पकडले. त्यास तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून केंद्राध्यक्षांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी कारवाईमुळे मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत व सुरळीत सुरू आहे.
तर आज सकाळी अंबरनाथमध्ये २०८ संशयित मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्या सर्वांची आधार कार्ड व पॅन कार्डद्वारे सखोल तपासणी करण्यात आली. हे नागरिक मतदानासाठी आले होते का, कोणासाठी मतदान करणार होते याचीही चौकशी करण्यात आली. या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण तापलं होतं.