मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असताना निवडणुका पुढे ढकलण्याची आणि त्यापूर्वी दोषमुक्त मतदार याद्या पुढे आणण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. महाविकास आघाडी, मनसे, शेतकरी पक्षाने मतदार याद्यांमधील दुबार, तिबार नावावर आक्षेप घेतला. मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका न घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. मात्र मतदार याद्यांमधील घोळ यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी रेटली जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे संकेत दिले आहेत. त्यांनी विरोधकांना फटकारले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी विरोधक सातत्याने करत आहेत. त्यावर आणि सरकारविरोधातील उद्धव ठाकरेंच्या संवाद दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. निवडणुका पुढे ढकलाव्यात असेच अपेक्षित उत्तर उद्धव ठाकरे यांना हवे आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे ढकलणे अशक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या जनतेचा कौल महायुतीलाच मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.